प्रकृती, अध्यात्म, परमात्म...... परब्रम्ह

प्रकृती

सत्व, रज, तम ही तीन प्रकृती मूल तत्वे आहेत. त्यांच्या साम्य अवस्थेचे नाव 'प्रकृती' आहे. ही मूल तत्वे जो पर्यंत कार्यरूपात परिणत होत नाहीत,मूल कारण रूपात अवस्थित असतात, तेव्हा त्यांना प्रकृती असे संबोधले जाते. म्हणजेच सर्व कार्यांच्या कारणरूप अवस्थेचे नाव प्रकृती आहे. तात्पर्य जेव्हा सत्व, रज, तम ही मूल तत्वे साम्य अवस्थेमध्ये असतात, त्यांचा एकमेकांवर कोणताही परिणाम अथवा भेसळ झालेली नसते तेव्हा त्यांना प्रकृती असे म्हणतात. ही मूल तत्वे द्रव्य रूप आहेत. त्यांच्यामध्ये 'संयोग-विभाग' धर्म रहातात. त्यांचे लघुत्व, चलत्व आणि गुरुत्व हे धर्म आहेत. ही तीन तत्वे पुरुषाचे उपकरण बनतात आणि पुरुषपशुचे बंधक त्रिगुणात्मक महत आदी रज्जुचे निर्माण करतात. रज्जुला गुण सुद्धा म्हटले आहे. म्हणून त्यांना गुण असे सुद्धा संबोधिले जाते. वैषम्य, द्वन्द्व इत्यादींची संभावना विकृती अवस्थेतच होऊ शकते. म्हणून गुणांची साम्यवस्था हे प्रकृतीचे स्वरूप म्हटले आहे.

अशा प्रकारे मूलतत्व तीन वर्गांमध्ये विभक्त आहे; ती संख्येने अनंत आहेत. जेव्हा चैतन्याच्या प्रेरणेने त्यामध्ये क्षोभ होतो, तेव्हा ती मूल तत्वे कार्योन्मुख होतात. अर्थात कार्यरूपात परिवर्तीत होण्यासाठी तत्पर होतात. त्यावेळी त्यांची अवस्था साम्य न रहाता वैषम्याकडे अग्रेसर होते. तेव्हा त्यांचा जो पहिला परिणाम आहे, त्याचे नाव 'महत्' आहे. त्यालाच बुद्धी म्हटले जाते. आता सर्ग प्रारंभ झाला आहे. साम्य अवस्था न रहाता सृष्टिची रचना होऊ लागली आहे.

महत् पासून अहंकार परिणीत झाला. अहंकार दोन प्रकारचा - सात्विक आणि तामस. सात्विक अहंकारापासून आंतर आणि बाह्य इंद्रिये उत्पन्न झाली. आंतर इंद्रिय एकच आहे - ते म्हणजे मन होय. बाह्य इंद्रिये म्हणजे पांच ज्ञानेंद्रिये आणि पांच कर्मेंद्रिये होय. श्रोत्र, त्वक्, चक्षु, रसना आणि घ्राण ही पांच ज्ञानेंद्रिये आहेत. तर वाक्, पाणी, पाद, पायु, उपस्थ ही पाच कर्मेंद्रिये आहेत. तामस अहंकारापासून पंचतन्यात्रा – शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध होत. पंचस्थल भूत – आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी, होत.

महत् पासून स्थूल भूतांपर्यंत तेवीस तत्व आहेत. हे सर्व प्रकृतीचे विकार आहेत. हे तेवीस, चोवीसावी प्रकृती आणि पंचविसावे चैतन्य-पुरुष. चेतन तत्व सुद्धा दोन वर्गांमध्ये विभक्त आहे - जीवात्मा आणि परमात्मा...... ! असे एकूण हा पंचवीस तत्वांचा मिळुन हा पसारा आहे.

सांख्यदर्शनच्या मते प्रकृतीला पूर्णरूपाने जाणून घेतलं, तर प्रकृती निवृत होते. प्रकृती निवृत झाली म्हणजे शेष रहाते; ते आत्मतत्व होय. म्हणजेच जीवाचा शिव होण्याच्या दिशेने अग्रेसर होणे होय.

अध्यात्म (आत्मा - स्वयं - स्वरूप)

आत्मा जो सर्वरूप आहे, सर्वज्ञ आहे, सदोदित आहे. निर्लीप्त, निराकार, निर्विकार, असंग आहे. ज्याचा भाव चैतन्य आहे तेच आत्म्याचे स्वरूप आहे. शरीर, प्राण, मन, इंद्रियांचा समुदाय हे आत्मा नाहीत. किंबहुना ह्या सर्वांना प्रकाशित करणारा आणि ह्या सर्वांच्या परे असणारा चैतन्यस्वरूप आत्मा आहे. आत्मा - आकाश, वायु, अग्नि, जल अथवा पृथ्वी नाही. या सर्वांचा साक्षी जो चैतन्यस्वरूप आहे तो आत्मा आहे. त्याचा कोणताही वर्ण नाही, आश्रम नाही तसेच तो इंद्रियांचाही विषय नाही. धर्म - अधर्म, सुख-दुःख आत्म्याचे नाहीत. आत्मा कर्ताही नाही आणि भोक्ताही नाही.

आत्मातत्वाची जो पर्यंत जाण येत नाही, स्वस्वरूपाची ओळख होण नाही. तो पर्यंत आत्मा ....... आत्मा सोडून इतर काहीही म्हणून वावरत असता कधी तो देह म्हणून वावरतो...... तर कधी तो बुध्दित्व म्हणून वावरतो....... कधी तो अहंकार म्हणून...... तर कधी तो मन म्हणून वावरतो.... तर कधी तो भूतकाळाला कवटाळून चित्त म्हणून वावरत असतो. प्रकृतीच्या अधीन असतो. जो पर्यंत आत्म तत्वाची ओळख होत नाही, जाण येत नाही तो पर्यंत प्रकृतीच्या परे होता येत नाही. म्हणून अध्यात्म घडायला हवं !!!

परमात्म...... परब्रम्ह

सर्वज्ञालाही जे ज्ञान नाही असे तत्व म्हणजे परमात्म तत्व होय. जो म्हणतो मी ब्रम्ह जाणतो.... त्याने काहीच जाणले नाही असे समजावे. म्हणजेच ज्याचे पूर्णत्वाने ज्ञान उपलध्द नाही असे तत्व म्हणजे 'ब्रम्ह' होय. वेद ही नेति... नेति असे म्हणून स्तब्ध होतात ते तत्व म्हणजे 'ब्रम्ह' होय. ब्रम्हाला जाणण्याचे अनेक मार्ग अथवा साधन अनेक ऋषी मुनींनी सांगितली आहेत. मात्र अमुक एक म्हणजे ब्रम्ह असं कोणीही सांगितलेलं नाही. "जो स्वतः ते तत्व आहे.... त्यालाही जे ज्ञात नाही ते 'ब्रम्ह' होय.

ब्रम्ह म्हणजे अनुभवातील तत्व होय. प्रकृतीने प्रदान केलेल्या साधनांच्या साहाय्याने ब्रम्हाची अनुभूती करता येत नाही. कारण ते प्रकृतीत असूनही प्रकृतीच्या परे आहे. इंद्रिये तिथं पर्यंत पोहोचू शकत नाहीत. मन, बुद्धी, अहंकाराच्या ते परे आहे.

'ब्रम्ह' शब्दातीत आहे. विश्वातील सर्व भाषांतील शब्दसंपदा एकत्र केली तरी ही ब्रम्हाचे वर्णन करण्यास ती असमर्थ ठरेल. अशा ब्रम्हाशी असलेली आपली संलग्नता, असे ब्रम्ह आपल्यात आहे आणि आपण ब्रम्हात आहोत... किंबहुना आपणच ब्रम्ह आहोत ते जाणण्याचा प्रवास घडण्यासाठी त्या ब्रम्हालाच प्रार्थना करावी की मला ..... पामराला आपल्या चरणी शरणागत करून घे आणि हा प्रवास घडेल अशी कृपा कर!!!

कारण त्याच्या कृपे शिवाय काहीच घडत नाही. त्या परब्रम्हाचे सगुण.... निर्गुण.... साकार.... निराकार रूप म्हणजेच "श्री स्वामी समर्थ" होय.

'ब्रम्ह' निराकार आहे. मात्र साकाराचे तेच मूल कारण आहे. ब्रम्हाशिवाय कोणतेच तत्व आकाराला येऊच शकत नाही

Subscribe Our Newsletter